दि. १८/६/२०१७ रोजी चंद्रपूर अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखेच्या वतीने अ. भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांतची बैठक ” भारतीय सद्विचार मंडळ,शास्त्री नगर ,मुल रोड चंद्रपूर येथे संपन्न झाली. ह्या बैठकी निमित्ताने अ. भा. ग्राहक पंचायत चे राष्ट्रीय अध्यक्ष (मंत्री स्तरीय ) तथा राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष श्री अरूण देशपांडे हे शनिवार पासून चंद्रपूरात दाखल झाले होते . विदर्भ प्रांत बैठकीनिमित्य रविवारी दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात विदर्भातील सर्व जिल्ह्यातील अ.भा.ग्राहक पंचायत चे सर्व जिल्हाध्यक्ष, सचिव , संघटन मंत्री व इतर प्रतिनिधी उपस्थित होते तसेच महिला प्रतिनिधींची देखील उल्लेखनीय उपस्थिती होती . ह्या बैठकीच्या आयोजनासाठी चंद्रपूर शाखेचे जिल्हाध्यक्ष मधुसूदन भूमकर , संघटन मंत्री पुरषोत्तम मत्ते, जिल्हा सचिव गोपाळकृष्ण पुराणिक , महानगर अध्यक्ष विनोद माढई, राजेश महाजन , विजय लोखंडे तसेच महिला आघाडीतील सदस्या सौ. संगीता लोखंडे ,सौ. भाग्यश्री भूमकर , सौ. नंदिनी चुनारकर ह्यांनी विशेष परिश्रम घेतले. श्री अरूण देशपांडे ह्यांच्यासह विदर्भ प्रांत अध्यक्ष श्री गजानन पांडे, विदर्भ सचिव श्री संजय धर्माधिकारी , श्री अशोक त्रिवेदी,श्री जकाते, श्री सुधीर मिसार मंचावर उपस्थित होते. ह्या बैठकीत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील मागील तीन महिन्यातील कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील योजना ,विविध विषयातील जसे रेरा कायदा, सायबर गुन्हे /फसवणूक तक्रारी , अन्न , नागरी पुरवठा , शिक्षण विभाग इत्यादी विषयावरील भविष्यातील योजनांचा आढावा व नियोजन ह्याबद्दल सखोल चर्चा झाली. शेवटी श्री अरूण देशपांडे ह्यांचे मार्गदर्शन ,शंका निरसन व कार्याची पुढील दिशा ह्या बाबत विस्तृत भाषण झाले. अ.भा.ग्राहक पंचायत चे काम सर्व उपस्थितांनी अधिक लोकांपर्यंत पोहचवावे, अगदी खेडोपाडीदेखील जाऊन कार्यकर्ते , प्रतिनिधी तयार करावेत व ग्राहक हित जागरूकतेच्या दृष्टीने संघटनेचे काम वाढवावे असे आवाहन श्री देशपांडे यांनी केले. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य श्री गोपाळकृष्ण पुराणिक आणि श्री पुरषोत्तम मत्ते यांचा राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरूण देशपांडे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात ग्राहक गीताने तर समारोप पसायदानाने करण्यात आला.
ह्या बैठकीनिमित्य चंद्रपूरात आल्यावर श्री अरूण देशपांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागातील शासकीय अधिकाऱ्यांसमवेत व ग्राहक प्रतिनिधींसह प्रदीर्घ बैठक घेतली व विविध विभागाच्या कार्यशैलीचा आढावा व सद्दस्थितीची जाणीव करून घेतली. विशेषतः अन्न , आरोग्य , शिक्षण , नागरी सुविधा क्षेत्रांशी निगडीत विषयांची माहिती घेऊन ग्राहक हितांच्या दृष्टीने सुविधा व तक्रार निवारणाबाबत तसेच लोक जागरूकी बाबत अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या . ग्राहकांना आपल्या न्याय हक्काबाबत जागरूकता आणणे, प्रशिक्षित करणे,तक्रारीबाबत योग्य कार्यवाही करण्यासाठी लागणारी माहिती ह्यावर विशेष भर देण्यात यावा असे आवाहन केले .
ग्राहकांनी कुठल्याही खरेदी बाबत काही तक्रार असल्यास टोल फ्री नं. १८००-११-४००० किंवा १४४०४ या नंबरवर तक्रार नोंदवावी. तसेच अन्न/पाणी खाद्य पदार्थ चा दर्जा व त्या अनुशंगाने आरोग्य सुरक्षेबाबत काही तक्रार असल्यास टोल फ्री नं. १८००-११-२१०० या नंबर वर तक्रार नोंदवावी . HOTEL व इतरत्र खराब अन्नाबाबत,भेसळीबाबत तक्रार असल्यास दुषित अन्नाचा फोटो काढून तो ९८६८६८६८६८ या नंबरवर whatsapp करावा किंवा fssai@gmail.com किंवा compliance@fssai.gov.in येथे मेल ने फोटोसह तक्रार पाठवावी (WHATSAAP NO. 08130009809) त्यावर निश्चित कार्यवाही करण्यात येते अशी उपयुक्त माहिती देण्यात आली. केवळ HOTEL व्यतिरिक्त इतर कुठेही जसे मोठे MALLS ,मल्टिप्लेक्स सिनेमा थिएटर येथे ग्राहक आपले स्वतः चे अन्न/खाद्य पदार्थ आणि पाणी वापरू शकतो असा अधिकार ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना आहे त्याला कोणी ही मज्जाव करू शकत नाही असे स्पष्ट केले. मल्टीप्लेक्स सिनेमागृहात तिथलेच महाग अन्नपदार्थ घेणे बंधनकारक करू शकत नाहीत तसे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी त्याबाबत रितसर कार्यवाही करण्यासंबंधी अवगत केले. अशा सर्व HOTEL मध्ये ,सिनेमा थिएटर मध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी तक्रार करण्यासंबंधी फोन नंबर्स ठळक अक्षरात दर्शनी भागात लिहीण्यासाठी बंधन करणारे निर्देश देण्याचे संबंधितांना सुचित करण्यात आले. शिक्षण विभागात देखील शाळेतून टी सी काढताना फक्त एक रूपया घेण्याचीच शाळा व्यवस्थापनांना परवानगी आहे जास्त रक्कम मागितल्यास संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्याय मिळवावा असे स्पष्ट केले व संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील ह्या बाबत दक्ष राहण्याचे आवाहन केले .
अशा ग्राहक अधिकार संरक्षण हितासाठी विविध अंगी चर्चा करून जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने व प्रत्येक तक्रार निवारणानंतर त्याला व्यापक प्रसिद्धी देऊन इतर नागरिकांना देखील त्या बाबत सतर्क राहण्यासाठी प्रवृत्त करावे अशी इच्छा श्री अरूण देशपांडे यांनी व्यक्त केली .
बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी बैठक स्थळ, भोजन व्यवस्था व इतर सर्व सुविधा उत्तम रितीने केल्या बद्दल चंद्रपूरच्या स्थानिक पदाधिकारांचे श्री देशपांडे व विदर्भ प्रांत अध्यक्ष श्री गजानन पांडे यांनी आभार मानले.
श्री मधुसूदन मा. भूमकर
जिल्हा अध्यक्ष,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत जि. चंद्रपूर .
मु. पो. उर्जानगर ,जि. चंद्रपूर (विदर्भ )
मो. नं.९४२३२००२४६ .